Pune: बँकिंग क्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना वरदान ठरू शकते- मेघदूत कर्णिक

Pune: Apprentice scheme can be a boon for banking sector- Meghdoot Karnik बँकेत अप्रेन्टिस घेतात याबाबतच अजून जागरूकता नाही. तसेच बँकिंग क्षेत्राने अप्रेन्टिस योजेनची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केल्यास बेरोजगार युवकांना रोजगारक्षम होण्यास मदत मिळेल.

एमपीसी न्यूज- अप्रेन्टिस योजनेची मोठ्या प्रमाणात प्रभावी अंमलबजावणी केल्यास ती वरदान ठरू शकते, असे मत बँकिंग फायनान्सशियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य अधिकारी मेघदूत कर्णिक यांनी व्यक्त केले.

पुण्यातील यशस्वी संस्था व बँकिंग फायनान्सशियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

मेघदूत कर्णिक म्हणाले, आज सर्व उद्योगक्षेत्रात खर्च कपातीवर भर देण्यात येत असून अशावेळी कामात निष्णात असलेल्या कुशल मनुष्यबळाची दुसरी फळी तयार करणे हे उद्योगक्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे.

यासाठी अप्रेन्टिस योजनेची खूप मोठी मदत होऊ शकते असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून अप्रेंटिसच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाची बँकिंग, फायनान्स व विमा क्षेत्राची गरज पूर्ण होण्यास मदत होईल असेही कर्णिक यांनी सांगितले.

या वेबिनारमध्ये यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व कल्याण जनता सहकारी बँकेचे उपमहाव्यवस्थापक अनंत कुलकर्णी यांनीही व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.

अनंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बँकेत अप्रेन्टिस घेतात याबाबतच अजून जागरूकता नाही. तसेच बँकिंग क्षेत्राने अप्रेन्टिस योजेनची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केल्यास बेरोजगार युवकांना रोजगारक्षम होण्यास मदत मिळेल.

अप्रेंटिसशिपच्या कालावधीतील संबंधित प्रशिक्षणार्थीचे वर्तन, आकलन त्याची कामातील निपुणता याबाबी व्यवस्थापनाला जोखण्याची संधी मिळते, ज्यानुसार त्याला पुढे नोकरीत सामावून घ्यावे की नाही हा निर्णय घेणे सोपे जाते.

तर दुसरीकडे त्या प्रशिक्षणार्थ्यालासुद्धा काम समजून घेण्यासाठी अप्रेंटिसशीपचा काळ मदतीचा ठरतो व तो सुद्धा आपल्या कामाप्रती जबाबदारीपूर्वक वर्तन करू लागतो असे अनंत कुलकर्णी यांनी संगितले.

तर वेबिनारच्या उत्तरार्धात ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात अप्रेन्टिस योजनेची अंमलबजावणी, टीपीए संकल्पना आदी बाबी सविस्तर समजावून सांगत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य व अप्रेन्टिस प्रशिक्षणार्थ्यांच्या करिअरला मिळणारी चालना याविषयी विवेचन केले.

‘यशस्वी’ संस्थेचे सुनील नेवे यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले. तर आभार संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.