Pune : चोखोबा ते तुकोबा समता वारीचे पुण्यात आगमन

एमपीसी न्यूज : संत चोखोबा आणि संत तुकोबा यांचा (Pune) कालखंड वेगवेगळा असला तरी ते आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले हे त्यांच्यातील साम्य आहे. संत विचारांच्या प्रभावामुळे समाजसुधारक घडले, असे प्रतिपादन चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज यांनी येथे केले.

संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीतर्फे श्री संत चोखामेळा महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र मंगळवेढा ते श्री संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहुगावमध्ये ‘चोखोबा ते तुकोबा’ या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या वारीचे बुधवारी (11 जानेवारी) शहरात आगमन झाले.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला (Pune) अभिवादन केल्यानंतर गाडगेमहाराज मठ, पालखी विठोबा मंदिर येथून गंजपेठेतील फुले वाडा येथे वारीचे आगमन झाले. तेथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ह. भ. प. मोरे यांनी संतविचार आणि वारीचे महत्त्व विशद केले. स्वरूपवर्धिनी महिला विभाग प्रमुख पुष्पा नडे, निलेश गद्रे, ॲड. वाल्मिक निकाळजे, प्रा. रमेश पांडव, शिवाजीराव मोरे, बाळासाहेब चौधरी, ॲड. राणी सोनवणे, फुलचंद नागटिळक, संपतराव जाधव, समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत परंपरा आणि समाजसुधारक यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा वारीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगून ह. भ. प. मोरे महाराज म्हणाले, महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक समतेची परंपरा दृढ करण्यात संतांचा मोठा वाटा आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंत साऱ्याच संतांनी महाराष्ट्राच्या भूमीत आपल्या विचारांच्या माध्यमातून समतेची पेरणी केली आहे. संतविचार आत्मसात करून समाजातील अनेक महापुरुष, समाजसुधारक यांनी भेदभाव विरहित समाजजीवन निर्मितीसाठी कार्य उभारले आहे. संतांनी केलेल्या समाजप्रबोधनातून आपला समाज एकसंध राहिला आहे.

बाळासाहेब चौधरी म्हणाले, आपल्या देशात संतांची परंपरा फार जुनी आहे. संतांनी समाजजागृतीसाठी आपले जीवन वेचले. समानतेचा संदेश या वारीतून दिला जात आहे.

प्रा. रमेश पांडव म्हणाले, समाजातील क्षीण झालेली शक्ती पुन्हा जागृत व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी भगीरथ प्रयत्न केले. समाजातील शेवटच्या घटकाला उभे करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. संविधानाची पाळेमुळे जनमानसात रुजत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संत साहित्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जावी : ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज

फुले वाडा येथून वारीचे आगमन सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम झाला. या वेळी बोलताना ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात समता, समरसतेचे विचार पोहोचणे गरजेचे आहे. संतांनी दिलेल्या विश्वात्मकतेच्या संदेशात धर्म कुठे येतो असा प्रश्न उपस्थित करून संत साहित्याची शिकवण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. निलेश गद्रे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. मनोज देवणे, रमेश पांडव, डॉ. प्रवीण रणसुरे, पोपट शिंदे, ॲड. वाल्मिक निकाळजे आदी उपस्थित होते.

कात्रज परिसरातील संत रोहिदास महाराज मंदिर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, सावरकर स्मारक डेक्कन, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधी, संगमवाडी येथे अभिवादन सभा झाल्यानंतर सायंकाळी समतावारीचे आळंदीकडे प्रस्थान झाले. उद्या (दि. 12 जानेवारी) सकाळी 8:30 वाजता देहू येथे समता वारीचा समारोप होणार आहे.

Ravet : मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस 24 तासात अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.