Pune : कथा यशस्वी उद्योजकांच्या या विषयावरील कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘कथा यशस्वी उद्योजकांच्या’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला परीक्षक म्हणून अरविंद पित्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे होत्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. मयूर माळी, प्रा.कुशल पाखले उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरविंद पित्रे म्हणाले की, उद्योजक हा रोजगार शोधणारा नसतो. तर तो रोजगार निर्माण करणारा असतो. आजच्या युगात विविध व्यवसायात उद्योजकतेच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भांडवल, मनुष्यबळ, कच्चामाल, मशिनरी यांचा योग्य मेळ घालून कल्पनेने आकर्षक नाविन्यपूर्ण उत्पादकाचे नाव निर्माण करणारा व्यक्ती उद्योजक होतो. असे मत व्यक्त केले. विशेष शारीरिक क्षमता असणाऱ्या अनेक व्यक्ती उद्योग क्षेत्रात यश मिळऊ शकतात. याची अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली. उद्योजक विद्यार्थ्यांमध्ये महत्वाकांक्षा आणि प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. नलिनी पाचर्णे यांनी केले. आभार डॉ. हर्षद जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.