Pune: चालत परराज्यात निघालेल्या बांधकाम कामगारांना भारतीय मजदूर संघाचा दिलासा

एमपीसी न्यूज – परराज्यात पायी निघालेल्या कामगारांचे प्रबोधन करून त्यांना पायी न जाता शासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या वाहनांची माहिती देत त्यांना थांबण्याची विनंती केली. तसेच त्यांना जीवनावश्यक साहित्याचे किट देत भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिला.

छत्तीसगड राज्यातील बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात कात्रज, आंबेगाव, धनकवङी परिसरात कामाला आहेत. लॉकडाउनमुळे काम बंद झाल्याने हे कामगार कुटुंबांसहित गावाकडे चालत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सचिव सचिन मेंगाळे यांना समजली. त्यानंतर मेंगाळे यांनी तात्काळ या भागातील कामगारांची भेट घेतली.

मेंगाळे यांनी छत्तीसगडमधील संघटनेचे पदाधिकारी देवेंद्र कौशिक, कामगार अधिकारी डी. एन. पात्र, अमित कुमार, देवांग कौशिक, पुणे कामगार कार्यालयातील अधिकारी यांच्याशी दूरध्वनी तसेच व्हीडीओ काॅलव्दारे चर्चा केली. चालत गावाकडे निघालेल्या कामगारांना चालत न जाण्याचे आवाहन केले.

तसेच शासन कामगारांना स्थलांतरित करण्यासाठी करत असलेल्या रेल्वे व इतर व्यवस्थांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कामगारांनी या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला व सरकारने गावाला जाण्यासाठी त्वरित व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संघटनेचे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब भुजबळ, गणेश टिंगरे यांनी पुण्यातील लोहगाव, वाकड, नगर रोड परिसरातील कामगारांना दिलासा दिला. झारखंड मधील बांधकाम कामगारांना सुद्धा चालत न जाण्याची विनंती केली व पर्यायी व्यवस्थेची माहिती दिली. तसेच या कामगारांना सेनापती बापट रोड येथे धान्य किटचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.