Pune : बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ -डॉ. ममता दिघे

मराठी विज्ञान परिषद आणि 'एमकेसीएल'तर्फे वैज्ञानिक कट्टा' उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यान

एमपीसी न्यूज – ‘बदलत चाललेली जीवनशैली, मुलींचे वाढलेले वय, मद्यपान आणि धूम्रपान यासारखी व्यसने, बदलत चालेली आहारशैली यामुळे महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. वंध्यत्वाची समस्या सोडविण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यासह जीवनशैलीत सुधारणा आणि व्यसनमुक्त राहणे आवश्यक आहे,असे मत स्त्रीरोगतज्ञ डॉ. ममता दिघे यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘वैज्ञानिक कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘वंध्यत्व : कारणे, उपाय व नवीन संशोधन’ या विषयावर डॉ. ममता दिघे यांचे व्याख्यान झाले. मयूर कॉलनी कोथरूड येथील भारतीय शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ, उपाध्यक्षा डॉ. नीलिमा राजूरकर उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. ममता दिघे म्हणाल्या, मुलीचे वाढलेले वय हे वंध्यत्वामागील महत्त्वाचे कारण आहे. मुलींना करिअर करण्यासाठी वेळ हवा असतो. तीस किंवा चाळीस वर्षांनंतर मुली मूल जन्माला घालण्याबाबत विचार करतात. जन्मताच स्त्रियांमध्ये दोन दशलक्ष स्त्रीबीज अंडी असतात. परंतू मुलींचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे बीजअंडी तयार होण्याचे प्रमाण कमी होते. योग्य वयात अंड्याचे फलित झाले नाही तर वंधत्व येते. चांगले स्त्रीबीज अंडी तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते.

त्यामुळे मूल होण्यास अडचणी निर्माण होतात. वंध्यत्वाची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे.आता मुलीचे वय विशीच्या दरम्यान असेल, तेव्हाच तिचे स्त्रीबीज अंडे फ्रीज करून ठेवता येते. जेव्हा मुल जन्मला घालायचे असेल, त्या वयात ते फ्रीज केलेले अंडे आणि पुरुष धातू याच्या साह्याने मुल जन्माला घालता येत आहे. टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा आता खूप विकसित झाले आहे. यामध्ये अंड्यांमधील गुणसूत्र चांगली आहेत कि नाही हेही ओळखता येते, त्यामुळे प्रजोन्नती प्रक्रियेस मदत होते.

डॉ. शर्वरी शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. थत्ते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.