Pune : तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस हवालदाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- शवविच्छेदन अहवालामध्ये बदल करण्याकामी संबंधित डॉक्टरांना देण्यासाठी 3 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस हवालदारासह एका इसमाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र गोपाळ आर्य (वय 48 वर्षे, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण संलग्न पोलीस नियंत्रण कक्ष) व संदीप जाधव (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका 55 वर्षाच्या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण, बहिणीची मुले व बहिणीचा पती यांच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात भादविसं कलम 498 अ, 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखक करून अटक करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपीना जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या बहिणीच्या सुनेच्या मृत्यू संदर्भात मेडिकल ऑफिसर ग्रामीण हॉस्पिटल यांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेमलेल्या पॅनल वरील डॉक्टरांना देण्यासाठी आरोपी राजेंद्र आर्य याने 3 लाखांची लाच मागितली होती.

या प्रकरणाची खात्री करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच मागितल्या प्रकरणी मंगळवारी (दि. 6) बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक प्रतिभा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.