Pune Corona 2nd Wave News : दुसऱ्या लाटेत 27 हजार मुलांना कोरोना, तर 21 मुलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी मध्ये सुरुवात झाल्या पासून जून अखेरपर्यंत पाच महिन्यात 18 वर्षाच्या आतील शहरात 26 हजार ९५३ मुले कोरोना बाधित झाली आहेत. सध्या शहरात 324 मुले उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 21 बालकांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेत लहान मुलांना झालेली कोरोनाची बाधा पाहता जागतिक आरोग्य संघटना, केंद्रशासन तसेच साथरोग तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेनेही खबरदारीचा उपाय म्हणून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आवश्‍यक बेड, ऑक्‍सिजन बेड, लहान मुलांचे आयसीयू तसेच व्हेंटीलेटर सज्ज ठेवण्यात येत आहे.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात 2 लाख 27 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 18 वर्षांच्या आतील 26 हजार 608 मुले होती. हे प्रमाण सर्व वयोगटातील एकूण रुग्णांच्या तुलनेत 10 टक्के इतके आहे. 18 वर्षावरील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर सध्या 96 ते 98 टक्के आहे, तर मृत्यूदर दीड ते दोन टक्क्यांच्या दरम्यान आहे. मात्र मुलांचा बरे होण्याचा दर 98.71 टक्के म्हणजेच जवळपास 99 टक्केइतका आहे. हि त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

सध्या शहरात 324 मुलांवर कोरोना उपचार सुरु आहेत त्यातील 46 मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील 13 मुले ऑक्सिजन बेडवर असून एकही बालक आयसीयू मध्ये दाखल नाही.तर उर्वरित सर्वजण गृह विलगीकरणात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.