Pune Corona News : पुणे शहरात 377 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख़्या वाढत असतानाच सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि इमारतीत 5 पेक्षा अधिक करोनाबाधित असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात आहेत. आठवड्याला या क्षेत्रांमधे 100 ने भर पडत असल्याचे मागील महिनाभरातील माहितीवरून समोर आले आहे. विशेषत: मोठ्या सोसायट्यांमध्ये ही स्थिती असून सीमा भिंतीसह प्रत्येकाची घरे प्रशस्त आणि मोठी असतानाही या साथीचा प्रसार सोसायट्यांमध्ये वेगाने होत आहे.

दरम्यान, शुक्रवारअखेर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सुमारे 377 झाली असून त्यात, 169 इमाराती तर 168 सोसायट्यांचा समावेश आहे. तर इतर 40 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.

पुणे शहरात 10 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे, परिणामी शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, महापालिकेकडून रुग्ण आढळलेला भाग बंद न ठेवता, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यास सुरुवात केली.

आठवड्याला 100 नवीन प्रतिबंधित क्षेत्र

त्यात, प्रामुख्याने शहरातील मोठमोठ्या आणि नामांकित सोसायट्यांचा समावेश आहे. गेल्या दोन आठवड्यांपर्यंत या सोसायटयांना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करताना आठवड्याला 30 ते 40 सोसायट्या वाढत होत्या; मात्र, मागील दोन आठवड्यांपासून आठवड्याला 100 नवीन प्रतिबंधित क्षेत्र तयार होत आहे.

तर अनेक सोसायट्यांमध्ये होम आयसोलेशन असलेल्या रुग्णा सर्रास बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी असल्या तरी एवढ्या ठिकाणी लक्ष देण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नसल्याने सोसायट्यांमधील रुग्णवाढ सुरूच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.