PUNE : राज्यात आठ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या चाचणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्यातील आठ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे  आरोग्य  मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. कोरोना चाचणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्याचा सरकार विचार करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील तीन ठिकाणी उद्यापासूनच ही केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज, मुंबईतील केइएम, कस्तुरबाचे दुसरे युनिट, हाफकिन आणि जे. जे. हॉस्पिटल या ठिकाणी ही चाचणी केंद्रे सुरु होणार आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद, धुळे, सोलापूर, मिरज या ठिकाणीही येत्या १० ते १५ दिवसांत अशी केंद्रे सुरु करण्यात येतील, असे आरोग्यमंत्रानी सांगितले.

सध्या राज्यातील ४२ कोरोनगग्रस्त रुग्णांची प्रकृती बरी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. कोरोनाची लक्षणे आढाळली असतील किंवा प्रवास केला असेल, अशा नागरिकांनीच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी उपकरणे केंद्र सरकारकडून उपलबद्ध करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यावर सरकारचाच भर आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्याचा सरकार विचार करीत असल्याची माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.