Pune Crime : स्पर्धा परिक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा खून? तपासासाठी पोलिसांची 5 पथके रवाना

एमपीसी न्यूज : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी (Pune Crime) संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्यासोबत नेमके काय झाले हे स्पष्ट होणार आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासासाठी पाच पथके तयार केली आहेत. तसेच तिच्या सोबत असणाऱ्या मित्राचा देखील कसून शोध घेतला जात आहे.

26 वर्षीय दर्शना पवार हिचा काल राजगड किल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जिल्हा हादरून गेला. त्यामुळे दर्शना हिच्यासोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तत्पुर्वी तो मित्र सीसीटीव्हीत कैद झाला असून, तेथून एकटा बाहेर पडताना कैद झाला आहे. जातेवेळी दोघे दिसत असताना तो तासाभराने बाहेर पडताना एकटा दिसल्याने संशय वाढला आहे.

दर्शना पवार मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळवत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने पास झाली होती. तसेच तिची फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) पदावर निवड झाली होती. तिने मिळवलेल्या या यशामुळे पुण्यात तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासाठीच ती पुण्यात आली होती. दरम्यान सत्कार आटोपल्यानंतर ती एका मित्रासोबत सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. नंतर ती परत आलीच नाही. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी ती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदविण्यात आली होती. तिच्यासोबत असलेला मित्र राहुल हंडोरे हा देखील बेपत्ता असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

रविवारी सकाळी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला दर्शनाचा मृतदेह (Pune Crime) आढळला. तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून आता या प्रकरणाचा कसून शोध सुरू केला आहे. संपूर्ण प्रकरणात बेपत्ता असणाऱ्या राहुल हंडोरे याच्यावर संशयाची सुई आहे. कारण घटना घडल्यापासून तो बेपत्ता आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी 5 पथके तयार केली आहेत. त्यानुसार संशयास्पद मृत्यूचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दर्शना हिचे पोस्टमार्टम झाले असून, तिचा मृत्यू नेमका कसा झाला? हे रात्रीपर्यंत समजेल, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यावरून देखील काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

Pune : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे बेतले जिवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.