Pune Crime News: 24 लाखाच्या बदल्यात सव्वा कोटी उकळले, आणखी पैशासाठी उच्चशिक्षित महिलेला डांबून ठेवले

एमपीसी न्यूज – वडिलांच्या उपचारासाठी व्याजाने घेतलेल्या 24 लाख रुपयांचा बदल्यात तब्बल सव्वा कोटी रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करत पुण्यातील एका उच्च शिक्षित महिलेला चार महिलांसह पाच जणांनी अपहरण करत डांबून ठेवले. पोलीस खात्यात आमची जबर ओळख असल्याचे सांगत या महिलेला अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत नंतर विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

45 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शगुप्तां सय्यद (वय 46), फरीदा युसूफ खान (वय 42, रा. वानवडी), आबिद शब्बीर साहा उर्फ डी. जे (वय 34, रा. खडकी), असमा नईम सय्यद (वय 35, रा. भवानी पेठ) आणि शहनाझ आसिफ शेख (वय 49, रा हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. खंडणी, अपहरण, सावकारी यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी असलेल्या वडिलांच्या उपचारासाठी फिर्यादी यांनी आरोपी असलेल्या महिलांकडून 2014 मध्ये व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाच्या व्याजाच्या बदल्यात आरोपी असलेल्या शगुप्तां हिने 29 लाख 23 हजार घेतले. तर फरीदा खान हिने 78 लाख 32 हजार तसेच असमा सय्यद हिने 29 लाख 4 हजार आणि शहनाझ हिने 6 लाख 62 हजार रुपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 23 हजार 635 रुपये घेतले. इतके पैसे घेतल्यानंतर देखील आरोपींनी आणखी पैसे देण्यासाठी फिर्यादी यांचा मागे तगादा लावला. इतकेच नाही तर फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांना एका खोलीत डांबून देखील ठेवले असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हा सर्व प्रकार असह्य झाल्यानंतर फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन काढत त्या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चार जणांना अटकही केली आहे. विमानतळ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.