Pune Crime News : आईचा सांभाळ करण्यावरून वाद, भावाकडून बहिणीच्या गळ्यावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – सारखी सारखी आईला का भेटतेस, तिचा सांभाळ का करतेस असे म्हणत सख्या भावाने बहिणीचा गळा दाबून आता तुला खलास करून टाकतो असे म्हणत तिच्या गळ्यावर चाकूने वार केले.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी गावात चार जुलै रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 33 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज दिलीप नवले (वय 30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची आई कधीकधी मुलीकडे राहायला जात होती. रविवारी देखील त्या मुलीकडे राहायला घोरपडी गावात गेल्या होत्या. यावेळी आरोपी देखील या ठिकाणी आला. आईला सारखी सारखी का भेटत असतेस या कारणावरून त्याने बहिणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गळा दाबून आता तुला खलास करून टाकतो, अशी धमकी दिली आणि किचन मधील चाकूने मानेवर वार केले.

दरम्यान फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.