Pune Crime News : आंतराष्ट्रीय क्रिकेट मॅचवर बेटींग लावणार्‍या दोघांना अटक, एका लाईनबॉयचाही समावेश

एमपीसीन्यूज : आयपीएल, बिग बॅश लिग, भारत – ऑस्ट्रेलिया टी 20 सामने, एकदिवसीय सामने, कसोटी सामने तसेच सध्या सुरू असलेल्या भारत-इग्लड दरम्यान सुरू असलेल्या टेस्ट मॅचेमध्ये नारिकांकडून लाखो रूपये बेटींगसाठी उकळणार्‍या क्रिकेट बेटींगचा गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी लाईनबॉय असलेल्या एका सराईतासह दोघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्यावर अडीच लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाईन बॉय अजय अनिल शिंदे (36, रा.खडक पोलिस लाईन,पुणे) आणि गौरव मनोज आहुजा (20, रा. टिळक रोड) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार सचिन निवृत्ती पोटे हा फरार झाला आहे.

विमाननगर येथील उमेश मूलचंदानी या 23 वर्षीय व्यावसायीक तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शिंदेवर चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण असे विविध सात गुन्हे दाखल आहेत. पोटे याच्यावर यापूर्वी दोन खुनाचे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे तसेच इतर प्रकारचे चार असे नऊ गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हॉर्स बेटींगमधील गैरप्रकार पुणे पोलिसांनी उघड केला होता. आता पोलिसांनी क्रिकेट बेटींगचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचे वाइन शॉपीचे देखील दुकान आहे. तर आरोपी शिंदे, आहुजा, पोटे हे क्रिकेट बेटींग मधील पार्टनर आहेत. दि. 9 फेब्रुवारी रोजी फिर्यादी आणि त्यांचे मित्र विमाननगर येथील हॉटेल फर्माईश येथे जेवण करण्यासाठी गेले होते.

जेवण झाल्यानंतर पाकीट आणि मोबाईल टेबलवर ठेवून फिर्यादी हात धुण्यासाठी गेले असताना गौरव आहुजा याने त्यांचे पाकीट आणि मोबाईल उचलून शिंदे आणि पोटे यांच्याकडे दिले. त्यानंतर फिर्यादीला आम्ही बेंटींगच्या धंद्यातील पार्टनर असल्याची ओळख आरोपींनी करून दिली. तुझा मित्र रजत ग्राेवर बेटींगमध्ये अडीच लाख रूपये हरला आहे, ते पैसे दे नाहीतर तुझ्या खानदानाला गायब करतो, अशी धमकी दिली.

फिर्यादीच्या दुसर्‍या मित्रालाही अडीच लाखांची खंडणी मागितली. तिघेही आरोपी क्रिकेट बेटींगच्या धंद्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आहुजा बेटींग मास्टर असून लॉर्डएक्चडॉट कॉम या बेवसाईटवरून आयडी विकत घेतल्याचे व क्रिकेट मॅच बेटिंग व्यतिरिक्त ऑनलाईन पोकर, बकाराट अंदर बाहर अशा प्रकारचे प्रतिबंधीत असलेले जुगारही ते चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संशयीत आरोपींच्या मागे मोठे गुंतवणुकदार असण्याची व त्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.