Pune Crime News : पुण्यात वाईल्डलाईफ फोटोग्राफरला लुबाडले, दोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – वाईल्डलाईफ फोटोग्राफी करण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफरला पुण्यातील बाणेर टेकडी परिसरात दोघांनी लुबाडले.

फोटोग्राफी करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या फोटोग्राफरला धमकी दिली आणि त्याच्या जवळील कॅमेरा, लेन्स, मोबाईल, ट्रायपॉड, सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम असा जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मुकुल मुखर्जी (वय 40) असे या फोटोग्राफरचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चतुःर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मुखर्जी हे फोटोग्राफर आहेत. त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे. मंगळवारी ते फोटोग्राफी करण्यासाठी बाणेर पॅन कार्ड क्लब परिसरातील टेकडीवर गेले होते. फोटो काढून परत येत असताना बाणेर येथील शिवमंदिराच्या पायथ्याशी दोघांनी त्यांना अडवले. त्यांना धमकी देत एक लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. चतुःर्श्रुंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.