Pune Crime News : मोक्काच्या गुन्ह्यात फरार गायकवाड पिता-पुत्रांच्या मुसक्या अखेर आवळल्या

एमपीसी न्यूज – मोक्काच्या दुहेरी गुन्ह्यात फरार असलेल्या गायकवाड पिता-पुत्रांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या. उद्योजक नानासाहेब गायकवाड तसेच त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना पुणे पोलीसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांना कर्नाटक येथून पकडण्यात आले आहे.

या दोघांवरही सुनेचा छळप्रकरणानंतर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिचंवड शहर पोलीसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गायकवाड पिता पुत्रांसह इतरांवर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत खंडणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड कुटूबांवर जमीन लाटण्यासोबतच बेकायदा सावकरकीचा गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतर नानासाहेब गायकवाड, पत्नी नंदा आणि मुलगा गणेश फरार झाले होते. तर, पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. त्यात मुलगी व जावई तसेच इतर एकाचा समावेश आहे. पण, नानासाहेब गायकवाड व मुलगा पसार झाले होते.

प्रथम पिंपरी-चिचंवड पोलिसांनी याप्रकरणात गायकवाड यांच्यासह इतरांवर मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान या तिघांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई व त्यांच्या पथकाला तो कर्नाटक येथे असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त देसाई, सहाय्यक निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक पंधरकर यांच्या पथकाने त्याला आज सायंकाळी कर्नाटक राज्यातून पकडले आहे. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.