Pune News : अँमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यास स्थायीची मान्यता 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या ताब्यात असलेल्या अँमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून 90 वर्षांच्या मुदतीच्या कराराने खासगी विकसकांना विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.

त्यामुळे 30 वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील भाडेकरारानुसार महापालिकेला 1753 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, 185 सर्वसाधारण अँमेनिटी स्पेस 19 विविध प्रकारे विकसित करून 30 वर्षांच्या भाडेकराराने देऊन 753 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. 85 आरक्षित जागांवर आहे त्याच आरक्षणानुसार विकसित केल्यास 30 वर्षांत सुमारे एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण 270 अमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देऊन 1753 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.’

रासने म्हणाले, अँमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यात याव्यात असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला होता. कोरोनाच्या काळात हा प्रस्ताव मागे पडला होता. शहर सुधारणा समितीने नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. भाडेतत्त्वावर दिलेली जागा पाच वर्षांच्या कालावधीत निर्धारीत केलेल्या सुविधेसाठी विकसित करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेतल्यानंतर राज्य सरकारची मान्यता घेण्यात येणार आहे.

रासने म्हणाले, ,’कोरोनाच्या काळात महापालिकेचे उत्पन्न घटलेले असून, प्रस्तावित विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीचा विचार करता उत्पन्नाचे विविध स्रोत शोधावे लागत आहेत. त्याचा भाग म्हणून वापरात नसणाऱ्या आणि गैरवापर होणा-या अँमेनिटी स्पेस दीर्घकाळासाठी भाड्याने दिल्यास महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘दीर्घ मुदतीचा भाडेकरारनामा करण्यासाठी शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत उपआयुक्त, मालमत्ता व्यवस्थापन आणि नगर रचनाकार यांचा समावेश असेल. ही समिती अँमेनिटी स्पेसचे चालू वर्षीच्या शासकीय दराने मूल्यांकन करून मिळकतीची किंमत मूल्यांकन रकमेच्या शंभर टक्के नुसार निश्चित करून त्यानंतर 30 वर्षे मुदतीसाठी व पुढील भाडेकरार महापालिका मिळकत वाटप नियमावलीतील तरतुदींनुसार पुढील कालावधीसाठी कराराचे नूतनीकरण करण्यात येईल.’

अँमेनिटी स्पेस म्हणजे काय

विकास नियंत्रण नियमावलीनुसार मान्य विकास आराखड्यात त्याच मिळकतीमध्ये आरक्षण असल्यास विकसकांना काही जागा उद्याने, क्रीडांगण, प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा, खेळाचे मैदान, अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन आदी एकोणीस सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी राखून ठेवावी लागते. या जागा महापालिका ताब्यात घेऊन विकसित करते.

पुणे महापालिकेकडे असलेल्या अँमेनिटी स्पेस आणि विकसनाचे पर्याय

सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या एकूण अँमेनिटी स्पेस – 732 – त्याचे क्षेत्रफळ 148.37 हेक्टर वापर निर्देशित केलेल्या अँमेनिटी स्पेस (आरक्षित) – 585 – त्याचे क्षेत्रफळ 129.06 हेक्टर शिल्लक अँमेनिटी स्पेस – 147 – त्याचे क्षेत्र 19.31 हेक्टर

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील अँमेनिटी स्पेस यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अँमेनिटी स्पेस महापालिकेकडे वर्ग करण्याची कार्यवाही जिल्हाधिकार्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. महापालिकेची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांचाही समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.