Pune : राष्ट्रवादीला हवाय खमक्या विरोधी पक्षनेता ; दीपक मानकर यांचे नाव चर्चेत

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला खमक्या विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी नगरसेविका नंदा लोणकर, वैशाली बनकर, अश्विनी कदम यांच्या बरोबरच नगरसेवक महेंद्र पठारे, सचिन दोडके, योगेश ससाणे यांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. मात्र, आता ऐनवेळी जेष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

या पदासाठी त्यांनी अर्ज केला नसला तरी, पक्ष त्यांच्या नावाचा विचार करीत असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मानकर यांचा अनुभव महत्वपूर्ण आहे. संपूर्ण पुणे शहरभर त्यांचे कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे.

26 जानेवारीच्या आत नवीन विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यासंधार्भातील अंतिम घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत. नंदा लोणकर यांना यापूर्वी महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले नाही. सचिन दोडके यांचा नुकताच विधानसभा निवडणुकीत केवळ अडीच हजार मतांनी पराभव झाला. महेंद्र पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांचा पराभव झाल्यानंतर त्या भाजप विरोधात महापालिकेत चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. योगेश ससाणे यांनीही वेळोवेळी आंदोलने करून भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.