Pune District Crime News : ‘स्कॉर्पिओ’तून चोरटे आले अन् पाच मिनिटात एटीएम मशीन घेऊन गेले

एमपीसीन्यूज : स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या काही चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटात मंचर शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे एटीएम मशीनच चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲक्सिस बँकेच्या या एटीएममध्ये पाच लाख रुपयांची रक्कम होती. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आजूबाजूला काही नागरिक होते. मात्र, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. चोरट्यांनी एटीएम मशीन नेल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली.

मंचर शहरातील एका व्यापारी गाळ्यात मागील चार वर्षापासून हे एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा चोरट्यांनी उचलला.

बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी या एटीएम मशीन जवळ आली. आसपास कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी वायर रोप एटीएम मशीनला गुंडाळून मशीन बाहेर ओढले आणि स्कॉर्पिओ गाडी ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हा सर्व थरार फक्त पाच मिनिटात घडला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यासाठी नाकेबंदी केली. पोलिसांची सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती. परंतु, हे चोरटे स्कॉर्पिओ गाडीसह पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारे एटीएम चोरून घेण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एटीएम मशीनच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.