Pune News : कचरा पेटवल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या

एमपीसी न्यूज  : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरील कचरा अज्ञाताने पेटवल्यामुळे महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या (Pune News) तीन वीजवाहिन्या जळाल्या. यामध्ये दोन उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भाग या परिसरामध्ये मंगळवारी (दि. 14) सकाळी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, नांदेड सिटी गेटजवळील ओढ्यावरील पुलाच्या कठड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. मात्र कठड्यावरून जाणाऱ्या महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्यांनी पेट घेतला. त्यामुळे खडकवासला व धायरेश्वर या दोन उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भागातील सुमारे 18 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

Maharashtra : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अग्निशामक दलाने ही आग विझवल्यानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, सहायक अभियंता  सचिन आंबवले व सहकाऱ्यांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची उपाययोजना केली. यानंतर दीड ते पावणेदोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. (Pune News) या घटनेमध्ये महावितरणचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच पोलीस ठाण्यात कचरा पेटविणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे

शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेच्या परिसरात, रोहित्राच्या आजूबाजूला तसेच फिडर पिलरजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. (Pune News) साठवलेला कचरा जाळू नये. कचरा पेटल्यामुळे वीजयंत्रणेला आगीचा धोका असल्याचे लक्षात येताच 24 तास सुरु असलेल्या महावितरणच्या 1912 / 18002123435 किंवा  18002333435 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन महावितरणतर्फ करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.