Pune News : राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी करा – अजित पवार

एमपीसी न्यूज – राज्यातील नागरिकांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शुद्ध, स्वच्छ पाणी दिले गेले पाहिजे. पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. नागरिकांना पाणी देत असताना त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्रयोगशाळा उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन वडगाव बुद्रुक येथे झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. पुण्याचा वैभवात भर पाडणारी वास्तू म्हणून उभारणी झाली पाहिजे असे म्हणत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर्जेदार यंत्रणा उभी राहत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जनतेची तहान भागविण्याचे काम केले जाते. नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा कामी यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील गोरगरीब, वंचित नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मधील तरतुदीनुसार पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क असून या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यातील सर्व जनतेला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य प्रयोगशाळेचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व उप विभागीय स्तरावर आजमितीस 175 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रयोगशाळेत प्रथमच जड/विषारी धातू, कीटकनाशके, किरणोत्सारी यासारख्या घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय प्रयोगशाळा ही पाणी गुणवत्तेसाठी शिखर संस्था असण्याबरोबरच राज्यासाठी संदर्भ संस्था म्हणून काम पाहणार आहे.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिकाची तसेच सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजनेची पाहणी करुन माहिती घेतली.

प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.