Pune: माणुसकीची हत्या थांबवली पाहिजे -डॉ.कुमार सप्तर्षी

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्याना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – धर्माच्या नावाने होणारा वाह्यातपणा वाढू देता कामा नये. एकात्मता वाढवणारे उपक्रम वाढवले पाहिजे. भारतात आपण सजग राहिलो, तर सर्व जगासाठी उत्तर शोधू शकू. माणुसकीची हत्या थांबविली पाहिजे, असे मत युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरपराधांना गांधी भवन येथे आयोजित सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या सभेत दिपगृह संस्थेचे सहसंस्थापक आशीष जेम्स, अभ्यासक प्रा. परिमल माया सुधाकर, संदीप बर्वे आणि अन्वर राजन आदी उपस्थित होते.

  • यावेळी डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले की, धर्माकडे वळणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्टया असुरक्षित असतात. वर्चस्ववादाच्या राजकारणातून दहशतवादी हल्ले होतात. मरणाचे दैवतीकरण, उदात्तीकरण होता कामा नये. गरीबी नष्ट केली नाही तर मरण विकत घेणारे वाढतात. ‘आपले आणि आपले नसलेले’ असा भेदच दहशतवादाला प्रोत्साहन देतात. जिहाद कडे तरुण आकृष्ट का होतात, याचा अभ्यास केला पाहिजे. मानवतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन आशीष जेम्स् यांनी केले.

‘कट्टरवादाचे अस्तित्व दाखवण्यासाठी दहशतवादी हल्ले होतात, असे नाही, तर त्या मागचा उद्देश ओळखला पाहिजे. जिहादी तरुणांना आकृष्ट करणे, हाही दहशतवादी संघटनांचा उद्देश असतो. या हल्ल्यानंतर श्रीलंकेत बाहेरील देशांचा हस्तक्षेप वाढू शकतो. श्रीलंकेचे सरकार याकडे कसे पाहते? यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.आत्मबलिदानाच्या वाटेवरील तरुणांना परत कसे वळवता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे.’, असे प्रा. परिमल माया सुधाकर यांनी सांगितले.

  • या हल्ल्याने फक्त श्रीलंकाच नाही, तर जगातील मानवतावाद्यांसमोर आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा सर्वांगीण विचार करण्यासाठी ही सभा आयोजित केली, असे संदीप बर्वे यांनी सांगितले.संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.