Pune : सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन’ विषयावर उद्या सभा

एमपीसी न्यूज- ‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ‘ या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे उद्या गुरुवारी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बिशप थॉमस डाबरे,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी असणार आहेत.

30 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ही जाहीर सभा गांधी भवन, कोथरुड येथे होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

“30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. सद्यस्थितीत त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हा या सभेचा हेतू आहे. नागरिक नोंदणी रजिस्टर ( एनआरसी ), सीएए, एनपीआर वरून निर्माण झालेली देशातील अस्थिर परिस्थिती सामान्य होण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचा आश्रय घेणे हा एकमेव मार्ग आहे. या विचारातून आपण समस्तांनी गांधींजींचे स्मरण करणे आवश्यक आहे, म्हणून गांधी विचार प्रेमी समस्त नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे”, असे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी या पत्रकात म्हटले आहे.

महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील प्रार्थना होईल. सायंकाळी साडेचार वाजता मिनी थिएटरमध्ये ‘ 30 जानेवारी 1948 ‘ हा माहितीपट दाखवला जाईल. 5 वाजून 18 मिनिटांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. दिवसभर महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.