Pune : कोरोना बाधितांवरील उपचारासाठी इनलॅक्स बुधराणी, पूना हॉस्पिटलचा पुढाकार ; 102 बेड्सची होणार सोय

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स अँड बुधराणी व पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे 102 बेड्स उपलब्ध होणार आहेत.

या दोन्ही हॉस्पिटलतर्फे पुणे महापालिकेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ. रिह्या पंजाबी, शरद कातरकी, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी करारावर सह्या केल्या. या सामंजस्य कराराला महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मान्यता दिली आहे.

या दोन्ही रुग्णालयाच्यावतीने कोरोना रुग्णांवर शासनाच्या नियमानुसार उपचार करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांसाठी इनलॅक्स अँड बुधराणी रुग्णालयात 46 आयसोलेशन व 6 आयसीयू 6 बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तर, पूना हॉस्पिटलमध्ये 46 आयसोलेशन आणि 6 आयसीयू बेडस आरक्षित ठेवण्यात येणार आहे.

दोन्ही रुग्णालयांना योजनेच्या व्यतिरिक्त पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांना अंशदायी वैद्यकीय योजनेच्या दराप्रमाणे औषधोपचार करावे लागणार आहेत. रुग्णांच्या बिलाची पूर्तता महापालिकेने 3 महिन्यांत पूर्ण करावी, पीपीई किट, एन – 95 मास्क महापालिकेने पुरवावे, असे करारात नमूद करण्यात आले आहे.

या सामंजस्य कराराचा कालावधी 6 महिने राहणार आहे. विविध अटी – शर्थी टाकून हा करार करण्यात आला आहे. पुणे शहरात रोज कोरोनाचा 1500 ते 1600 चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रोज 100 ते 150 रुग्ण आढळून येत आहेत. तर, कोरोनावर मात करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.