Pune : समृद्ध जीवनमधील गुंतवणूकदारांची बुडालेली रक्कम परत मिळणार

अ‍ॅड. प्रवीण टेंभेकर यांचे आश्वासन; कायदेशीर लढ्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – समृद्ध जीवन फूडस इंडिया लिमिटेड कंपनीने लाखो नागरिकांची फसवणूक केली आहे. नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. समृद्ध जीवनच्या 137 स्थावर मालमत्ता 51 वाहने शासनाने जप्त केल्या असून 875 बँक खाती गोठवली आहेत. एमपीआयडी कायद्यांतर्गत जप्त केलेली मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची बुडालेली रक्कम परत मिळणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अ‍ॅड. प्रवीण टेंभेकर यांनी सांगितले.

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या लाखो ग्राहकांच्या वतीने लढण्यासाठी अ‍ॅड. टेंभेकर यांनी तयारी दाखवली आहे. प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही कायदेशीर लढाई लढली जात आहे. पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे, यासाठी करण्यात येत असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनतर्फे पुणे येथे सभा आयोजित करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सभेत अ‍ॅड. टेंभेकर बोलत होते. यावेळी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष धनेश चट्टे पाटील, रुपेश माळी, महेश शेलार, आरती दातार, समाधान झाडबुके, विजय शेंडगे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने 2 ऑगस्ट 2018 रोजी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, समृद्ध जीवनची जप्त केलेल्या मालमत्ता विकून तसेच 875 खात्यावरील रक्कम एकत्र करून गुंतवणूकदारांना त्यांची बुडालेली सर्व रक्कम परत केली जाणार आहे. लाखो गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयात तसेच सक्षम प्राधिकारी यांच्याकडे बुडालेली रक्कम परत मिळवण्यासाठी क्लेम सादर केल्याचे अ‍ॅड. टेंभेकर यांनी सभेत स्पष्ट केले. तसेच तवणूकदारांनी संभ्रमित होऊन योग्य प्रक्रियेपासून दूर राहू नये, असे आवाहन देखील केले.

पीडित गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने केलेला एमपीआयडी हा कायदा अत्यंत प्रभावी आहे. या कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली मालमत्ता विकण्यासाठी व गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सक्षम प्राधिकारी शासनाने नियुक्त केले आहेत. तसेच या कायद्यानुसार हा खटला विशेष न्यायालयात चालवण्यात येणार आहे. मालमत्तेची विक्री झाल्यानंतर पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे निश्चितपणे मिळतील, असा विश्वास देखील अ‍ॅड. टेंभेकर यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.