Pune News : मराठा आरक्षण समन्वय समितीचे जागरण गोंधळ आंदोलन, अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी

Pune: Maratha Reservation Coordinating Committee's Jagran Gondhal Andolan demands removal of Ashok Chavan मराठा आरक्षणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना ते टिकावे यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे काहीही करत नाहीत.

एमपीसी न्यूज – अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तातडीने हटवावे, अशी मागणी करीत मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीने रविवारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे हे अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांनी त्याचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अशोक चव्हाण जिथे-जिथे जातील तिथे-तिथे आंदोलन करणार असल्याचा इशाराही विनायक मेटे यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना ते टिकावे यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे काहीही करत नाहीत. आरक्षण टिकवण्यासंदर्भात कुठलेही नियोजन त्यांच्याकडे नाही. मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी कोर्टात मांडायला आम्ही सांगतो आहोत, ते सुद्धा अशोक चव्हाण करीत नसल्याचा गंभीर आरोपही मेटे यांनी केला.

अशोक चव्हाण हे उपसमितीचे निष्क्रिय अध्यक्ष म्हणून सिद्ध झाले आहेत. आता कर्तबगार मंत्री त्या ठिकाणी नेमावा. त्यामुळे अशोक चव्हाणांना हटवा आणि मराठा आरक्षण टिकवा, अशी आग्रही मागणी केली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा अन्य कोणा मंत्र्याकडे हा कारभार द्यावा. महाविकास आघाडी सरकारमध्ये आजिबात समन्वय नाही. सुप्रीम कोर्टात मराठा समाजाबद्दल जी काळजी घ्यायची आहे ती घेण्याऐवजी फक्त आम्हाला खाते कसे मिळेल, खुर्च्या कशा शाबूत राहतील याच्याकडे मंत्र्यांचे लक्ष असल्याचेही मेटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.