Pune : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भडका उडाला तर कोण जबाबदार ? – खासदार उदयनराजे

मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्याची मागणी

मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही याची जाणीव ठेवून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ते आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते.

उदयनराजे पुढे म्हणाले, ” महिला 25-30 वर्षांपासून मराठा आरक्षणासंदर्भात फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. इतर कुठल्याही समाजाचा आरक्षणाला विरोध नाही, मग उशीर का होतो. उद्या राज्यात भडक उडाला तर कोण जबाबदार असणार? परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा ” लवकरच मराठा आरक्षण परिषद भरवून सर्व समन्वयकांचे मत जाणून घेणार आहोत. त्या परिषदेत जो निर्णय होईल त्याला सर्वांची मान्यता असेल असेही ते म्हणाले.

“केंद्र सरकारने अट्रोसिटी कायद्यात बदल करण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढीच मराठा आरक्षणसाठी दाखवावी. घटना ही माणसांनी माणसांसाठी लिहिली आहे. आवश्यकता पडल्यास घटनेत बदल करा. 58 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचे सरकारने विचार करावा. सरकारने तेव्हाच यावर तोडगा काढला असता तर ही परिस्थिती आली नसती”असे खासदार उदयनराजे म्हणाले.

” खासदार म्हणून मी ही परिषद घेत नाही, आंदोलनाला दिशा देण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही परिषद असेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे. ही दिशा हिंसक नसावी, कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी ही दिशा नसावी” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“मराठा समाजाच्या वेदना समजून न घेता सरकारने त्यांच्यावर दरोड्यासारखे गुन्हे दाखल केले. शासनाने आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घ्यावेत. नाहीतर समाजात भडका उडेल आणि हे सर्व थांबविण्यासाठी कुणी नसेल. आरक्षण मिळावे इतकीच माफक अपेक्षा या समाजाची आहे” असे उदयनराजे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.