Pune : महापालिका आयुक्त धाडसी निर्णय घेत नाहीत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी परिस्थिती हाताळावी, विरोधकांचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखीनच गंभीर होत आहे. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड धाडसी निर्णय घेत नाहीत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाच्या उपाययोजना, सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष यावर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते, अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, मुंबईमध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, विरोधक, प्रशासन हातात हात घालून काम करतात. पुण्यातील सत्ताधारी मात्र तसे काम करीत नाही. विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्यामध्ये कोणताही समनवय दिसून येत नाही. पुण्यातील तज्ज्ञ डॉकटरांना विश्वासात घेण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

महापालिकेच्या स्थायी समितीने गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्याला राज्य शासनानेही मान्यता दिली. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हजारो गोरगरीब नागरिकांना धान्य मिळत नासल्याचा आरोपही धुमाळ यांनी केला.

कोरोनाच्या संकटातून पुणेकरांना वाचवता येत नसेल तर महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या सेवेत परत जावे, असे आवाहनही विरोधी पक्षांनी केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांसाठी चांगले जेवण मिळत नाही. एकाच खोलीत कारोना पॉझिटिव्ह – निगेटिव्ह रुग्णांना ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.