Akurdi: आकुर्डी गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रमतर्फे रोज तीन हजार गरजूंना मिळतोय मायेचा घास

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे दिवसेंदिवस लाॅकडाऊनचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या तसेच हातावरचे पोट असलेल्या गरजू लोकांची उपासमार होत आहे. या गरजू लोकांना विविध संस्था पुढे येऊन मोलाचे सहकार्य करत आहेत. या सहकार्‍यांमध्ये आकुर्डी येथील मानसरोवर गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रम देखील आपली मोलाची भूमिका  बजावत आहे.

श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर गुरुद्वारा आकुर्डी आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रम यांच्यातर्फे जवळजवळ 3000 गरजू नागरिकांना दररोज मायेचा घास भरवला जात आहे. गुरुद्वारा व मौनीबाबा वृद्ध आनंदाश्रमाच्या वतीने शिजवलेले अन्न पॅकेटमध्ये पॅक करून शहरातील विविध ठिकाणी गरजूंपर्यंत पोहोचवले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 24 मार्च रोजी लाॅकडाऊन लागू करण्यात आला. या लाॅकडाऊनचा कालावधी दोन वेळा वाढवण्यात आला. गुरुद्वारा व आश्रम कडून 24 मार्च रोजी सुरू करण्यात आलेल्या मदत कार्याला मात्र कधीही खंड पडला नाही.

गुरुद्वारा व मोनी बाबा वृद्ध आनंदाश्रमच्या वतीने आत्तापर्यंत चारशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यामध्ये आवश्यक असणाऱ्या डाळ, पीठ, तेल, मीठ, तांदूळ व इतर गोष्टींचा समावेश असलेले किट तयार करण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या या किटचे वाटप हिंजवडी, देहुगाव, नांदेड सिटी, बावधन याठिकाणी करण्यात आले. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश मधून उद्योगधंद्यासाठी शहरात आलेल्या आणि सध्या मोशी येथे वास्तव्यास असणाऱ्या सत्तर मुस्लिम कुटुंबांना मोफत शिधा देण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा यांच्या वतीने वडापावचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कौतुक केले आहे.

शहरातील काही दुर्गम भागात मदत पोहचणे अवघड आहे, त्या ठिकाणीसुद्धा गुरुद्वारा व मौनीबाबा वृद्ध आनंदाश्रमातर्फे मदत पोचवण्याचे काम केले जात आहे. या अंतर्गत चाकण, बोपखेल, निघोज व तळवडे या भागात मदत पोहोचवली जात आहे.

या उपक्रमासाठी मनजितसिंग खालसा, दशमीतसिंग, गुरु पाल सिंग, दीपक गोस्वामी आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रमाचे अध्यक्ष अशोक खोसला तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.  संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपली भूमिका ओळखून काम केले पाहिजे. आकुर्डी गुरुद्वारातर्फे समाजातील गरीब व इतर गरजू नागरिकांना मदत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असा भावना गुरुद्वाराचे मंजितसिंग खालसा यांनी व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.