Pune News : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुण्यात तीन महिन्यात साडेअठरा टन धान्यवाटप – आमदार शिरोळे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनेतून मे, जून, जुलै असे तीन महिने आणि ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पुणे शहरात साडे अठरा टन गहू आणि तांदूळ याचे रेशनद्वारे मोफत वाटप करण्यात आले, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुणे शहरात झालेत धान्य वाटपाबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी आमदार शिरोळे यांनी चर्चा केली. मे, जून, जुलै हे तीन महिने आणि ऑगस्टच्या 10 तारखेपर्यंत सुमारे अकरा टन गहू आणि साडेसात टन तांदूळ शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटण्यात आला. केंद्राकडून मंजूर झालेल्या धान्यापैकी 94.96 टक्के गहू, तांदळाचे वाटप झाल्याची माहिती अस्मिता मोरे यांनी दिली.

कोविडची साथ, त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध यामुळे अनेक कष्टकऱ्यांचे रोजगार घटले, अनेकांचे बुडाले. या गरीब वर्गाला सहाय्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना जाहीर केल्या. पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना त्याचाच एक भाग आहे. पैशाअभावी देशात कोणी उपाशी राहू नये, अशा विचारातून पंतप्रधान मोदी यांनी ही योजना राबविली. पुण्यातील शिधापत्रिकाधारकांनाही याचा लाभ झाला आणि मदत झाली, असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे. या योजनेला दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.