Pune News : शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग 

सहा दिवसांत रस्त्यांवरील साडेसात हजार स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा

एमपीसी न्यूज – शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते  खचले आहेत, तर बऱ्याच भागात रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची तयारीला सुरुवात केली आहे. सर्व सहा दिवसांत विविध रस्त्यांवरील साडेसात हजार स्क्वेअर मीटरचा परिसर खड्डे बुजवून दुरुस्त केल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात महापालिकेकडून रस्त्यांवर ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासह विविध सेवा वाहिन्यांसाठी रस्ते खोदाई करण्यास परवानगी दिली जाते. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून रस्ते दुरुस्त करण्याचे बंधन घातले जाते. यंदा मात्रस दरवर्षीचा शिरस्ता बाजूला ठेवून पावसाळ्यातही खोदाईची कामे सुरूच ठेवण्यात आली. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले, त्या ठिकाणचे रस्ते योग्य प्रकारे पूर्ववत केले नाहीत.

सलग आठवडाभर पाऊस पडल्याने शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. खोदाईमुळे खराब झालेले रस्ते आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

पावसाने उघडीप दिल्याने पथ विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

याबाबत माहिती देताना पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, “शहरातील 12 मीटरपेक्षा अधिक रुंदी असलेल्या रस्त्यांवरील खड्डे मुख्य खात्याकडून बुजविले जात आहेत. तर त्यापेक्षा लहान रुंदीचे रस्ते संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून बुजविले जात आहेत. यासाठी कोल्डमिक्स, खडी, डांबर, इमल्शनचा वापर केला जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी 50 किलो वजनाच्या 875 कोल्ड मिक्सच्या पिशव्या वापरण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.