Pune News : हृदयविकार व स्ट्रोक रुग्णांच्या विशेष शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक कॅथलॅब, पुण्यातील लोकमान्य रुग्णालयाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवर मध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत गरजेचं असते. परंतु, शहरातील वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब लागतो. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी पुण्यातील लोकमान्य रुग्णालयात स्वतंत्र कॅथलॅब सुरु करण्यात आली आहे.

या विभागाद्वारे आता रुग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कँथलॅबच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्यातील लोकमान्य रुग्णालयाने हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिका मॉक ड्रिल ड्राइव्ह आयोजित करण्यात आले होते.

आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी लोकमान्य रुग्णालयानं पाच रुग्णवाहिकेचे पाषाण, शिवाजी नगर, स्वारगेट, कोथरूड आणि औंध या भागात सात दिवसांसाठी मॉक ड्रिक ड्राइव्ह घेण्यात आले होते.

हृदयविकार किंवा स्ट्रोकचा झटका आलेल्या रुग्णांसाठी पहिल्या 60 मिनिटांचा काळ खूप महत्त्वाचा असतो. परंतु, शहरातील वाहतूक, रस्त्याच्या कडेला सुरू असलेली बांधकामे आणि रहदारी यामुळे ट्रॅफिकमधून वाट काढत रुग्णालयातपर्य़ंत पोहोचायला लागणारे 30 मिनिटांचे अंतर कापायला सुद्धा रुग्णवाहिका चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. बऱ्याचदा वाहतूक गर्दीमुळे रुग्णालयात पोहोचायला विलंब लागल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. हे विचारात घेऊन रुग्णवाहिका लवकरात लवकर कशी रूग्णालयात पोहचू शकेल, यासाठी रुग्णवाहिका मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आले होते.

लोकमान्य रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन पत्की म्हणाले की, ‘सुमारे 80 टक्के लोकांना घरातच हृदयविकाराचा झटका येतो. अशा स्थितीत रुग्णाला 60 मिनिटांत वैद्यकीय सुविधा मिळाल्यास किमान 50 टक्के हृदयविकारामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. म्हणून छातीत किंवा पाठीत दुखणं, धडधडणे, मान, पोट, दात किंवा जबडा दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वेळीच निदान व उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे डॉक्टरांना शक्य होते.’

लोकमान्य रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की, ‘वाहन चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही राबवत असलेल्या उपक्रमांपैकी एक म्हणजे अ‍ॅम्ब्युलन्स मॉक ड्रिल ड्राइव्ह. या मोहिमेद्वारे रुग्णवाहिकेला गर्दीतून जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या, असे आवाहन अन्य वाहन चालकांना करण्यात येत आहे. जेणेकरून रुग्णवाहिका लवकरच रूग्णालयात पोहोचल्यास रुग्णावर तातडीने उपचार होऊ शकतील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.’

मंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलने घेतलेला हा एक अनोखा उपक्रम आहे. हदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक मिनिटं महत्त्वाचा असतो. यासाठी रुग्णालयाद्वारे सुरु करण्यात आलेली रुग्णवाहिका मॉक ड्रिल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत करेल. सायरनचा आवाज ऐकल्यानंतर, रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णवाहिकेला त्वरीत मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. या रूग्णालयाने अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून रुग्णांची सेवा करून नावलौकिक मिळवले आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.