Pune News : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे आयोजित संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखेडे

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या 22 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, काषाय प्रकाशनाचे संचालक प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे.‌

तसेच, पुढील महिन्यात होणाऱ्या सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्रा. वानखेडे यांच्या नावावर बारा काव्यसंग्रह असून, काळीजशिल्प, आई नावाचं महाकाव्य, बाप नावाचा वटवृक्ष, काव्यमाला, कृपाछत्र आणि कन्यारत्न या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. अलीकडेच त्यांचे बंधुतेचा अनुबंध हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

प्रा. कदम यांची आतापर्यंत पाचशेहून अधिक व्याख्याने झाली असून, छत्रपती शिवराय व आजचा समाज, छत्रपती संभाजी राजे, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज, असे त्याच्या व्याख्यानांचे विषय आहेत. ही दोन्ही ही संमेलने पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहेत, असे रोकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.