Pune News : तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा : उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा.

अग्निशमन यंत्रणा- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

‘म्युकर मायकोसिस’ वरील औषधांचे नियंत्रण- म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील.

लसीकरणावर भर- कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.