Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता !

एमपीसी न्यूज : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला देणार याबाबत उत्सुकता आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ गेली अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते याबबत उत्सुकता आहे.

गतवेळचे प्रतिस्पर्धी सारंग श्रीनिवास पाटील यांनी अनपेक्षित माघार घेतल्यामुळे अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे या तिघांमध्ये तिकीट मिळविण्याची तीव्र स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे दोन वेळा अल्प फरकाने निवडून गेले आहेत. भाजप उमेदवार या मतदारसंघातून पाचपैकी चार वेळा सलग निवडून गेला आहे. त्यानंतर त्यांनी कोथरुड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. ते निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला.

तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. त्यामुळे आता भाजप या जागेवरुन कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे. पुण्यातून मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, कराडचे शेखर चऱ्हेगावकर, पिंपरीतून सचिन पटवर्धन, सोलपुरातून संग्राम देशमुख यांची नावे देखील चर्चेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्षांनी निवडणुकीसाठी मतदार नोंदणी केली आहे.

यंदाही शरद पवार यांचा शब्द निर्णायक ठरणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार पवार यांच्या पसंतीनेच रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी पवार यांचे मत महत्त्वाचे ठरु शकते. अशा वेळी शरद पवार हे ज्याच्या पारड्यात आपले अनुकूल मत टाकतील त्यालाच उमेदवारी मिळेल हे स्पष्ट आहे.

त्यामुळे अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, अजिंक्यराणा पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते की धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रवादी आणखी कोणता नवा चेहरा रिंगणात उतरवते याबबत उत्सुकता आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत मिळून एकूण 58 तालूके आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विस्तीर्ण अवाका ध्यानात घेता उमेदवार निवड महत्त्वाची ठरते.

अशा वेळी उमेदवाराने मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी घेतलेले कष्ट, वय, सामाजिक प्रतिमा, लोकसंपर्क आणि नेतृत्वासोबतचे संबंध अधिक महत्त्वाचे मानले जातात.

त्यामुळे भाजप त्यांचा गड राखतात का, की राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीचं खातं उघडतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.