Pune News : मेधा कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, कारण…

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. मेधा कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर तर नाहीत ना अशी खमंग चर्चा रंगली होती.

या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण मेधा कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील.

2014च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे कापण्यात आला होतं. त्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं होतं आणि ते निवडूनही आले होते. यानंतर मेधा कुलकर्णी यांना राज होत्या आणि त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी प्रकटही केली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीने कुजबुज सुरू झाली होती.

आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण 1 ऑक्‍टोबर रोजी मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड परिसरात आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. आमदार चंद्रकांत पाटील ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले आणि इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या विविध नेत्यांच्या फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे मेधा कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची निव्वळ अफवा होती हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.