Pune News : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी महिलांना आठ तासांची ड्युटी

एमपीसी न्यूज – पोलीस दलातील कर्मचारी महिलांना आठ तासांची ड्युटी देण्याबाबत नागपूर पोलीस आयुक्तांनी प्रायोगिक तत्वावर निर्णय दिला. त्याचे स्वागत करत पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांनी याबाबत विचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी महिलांना देखील आठ तास ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.

पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना अनेक वेळा सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने अनेकदा ज्यादा तास कर्तव्य करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होतो. त्याचा त्यांच्या दैनंदिन कर्तव्यावर देखील परिणाम होतो.

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 28 ऑगस्ट रोजी शहर पोलीस दलातील कर्मचारी महिलांना आठ तास ड्युटी लावण्याचे आदेश दिले. याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुक केले. तसेच राज्य पोलीस दलातील इतर घटकांनी याबाबत विचार करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश देत, पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर पासून आठ तास ड्युटी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. हा आदेश प्रायोगिक तत्वावर देण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुरुष पोलीस अंमलदारांना देखील आठ तास ड्युटी लावण्याचा मानस असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.