Pune News : पुण्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; आयुक्तांनी दिले सुधारित आदेश

एमपीसी न्यूज – कोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी पुणे महापालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सातपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

याबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी (दि. 18) सुधारित आदेश दिले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की –

# पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा (Essential Category ) मधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील.

# अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers ( Non-Essential Shops) शनिवार व रविवारी बंद राहतील.

# रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेकरिता रात्री 11 पर्यंत सुरु राहतील.

# कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारी दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.

# हा आदेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहणार आहे.

# वरील आदेशा व्यतिरिक्त इतर बाबींसाठी 11 जून रोजी दिलेल्या आदेशातील मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

# हे बदल 18 जूनपासून लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.