Pune News : अखेर वडगावशेरीत भामा आसखेडचे पाणी खळाळले !

एमपीसी न्यूज : बहुप्रतिक्षीत भामा आसखेड धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून  वडगावशेरीतील कलवड वस्तीमध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरीकांनी जल्लोष व्यक्त केला.

सन 2013 पासून जवळपास 445 कोटी रुपये खर्चून भामा आसखेड धरणातून पाणी योजनेचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू होते. या प्रकल्पासाठी तब्बल 22 विभागांची परवानगी घेण्यात आली होती.

शहराच्या पूर्व भागाचा पिण्याचा प्रश्न सुटण्यासाठी भामा आसखेड प्रकल्प पूर्ण होण्याची नागरीक आतुरतेने वाट पाहत होते. या प्रकल्पातून सर्व दिशांना पाणी वळविण्यासाठी धरणात ‘लेक टॅपिंग’चा यशस्वी प्रयोग झाला.

धरणातून जॅकवेलने पाणी पंपिंग करून 8 किलोमीटरपर्यंत आणले. त्यानंतर 34 किलोमीटरपर्यंत पाईपलाईन ग्रॅव्हिटीने पाणी आणले आहे. कुठेही पाणी पंप करण्याची गरज भासणार नाही. कुरूळीमध्ये कमीखर्चात जवळपास 10 एकरमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. या योजनेतील पाणी साठवण्यासाठी एकूण 26 जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) उभारण्यात आल्या आहेत.

दररोज 200 एमएलडी पाणी नागरीकांना मिळू शकणार आहे. यामुळे पूर्व भागातील 50 चौरस किलोमीटर क्षेत्रातील सुमारे 5 लाख लोकांची तहान यामुळे भागणार आहे. कालपासून भामा आसखेडचे पाणी दारापर्यंत आल्यामुळे टँकर माफियांचा गोरखधंदा बंद होऊन कंबरडं मोडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.