Pune News : …यासाठी दहावी बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून हिंदू शब्द वगळला

एमपीसी न्यूज – दहावी बारावीच्या परिक्षा फॅार्ममधून हिंदू हा शब्द वगळण्यात आला आहे. त्यासंबधित विविध प्रसारमाध्यमावर माहिती प्रसारित होत आहे. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रकटन जाहीर करण्यात आले असून, हा बदल 2014 पासूनच परिक्षा फॅार्ममध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याचे मंडळाने म्हंटले आहे.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने 2013 मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्याचा तपशील मंडळाकडे मागितला होता. त्यानुसार, मंडळाच्या परीक्षा समितीची सप्टेंबर 2013 ला सभा घेण्यात आली. या सभेत झालेल्या ठरावानुसार परीक्षा फॉर्ममध्ये मायनॅारिटी (Minority Religion) आणि नॅान-मायनॅारिटी (Non-Minority) हे दोन रकाने वाढवण्यात आले आहेत. असं स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे.

त्यानुसार, मायनॅारिटी (Minority Religion) या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, पारसी व जैन हे अल्पसंख्यांक समुदाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मंडळाच्या आवेदनपत्रामध्ये घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्याना नॅान-मायनॅारिटी (Non-Minority) हा रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, हि माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नसल्याचे मंडळाने म्हंटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे आवेदनपत्र संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यलायामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरून घेतात. या आवेदनपत्रात विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये मायनॅारिटी (Minority Religion) हा रकाना सन 2014 पासून समाविष्ट करण्यात आला आहे. या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, पारसी व जैन यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी नॅान-मायनॅारिटी (Non-Minority) हा रकाना 2014 पासूनच समाविष्ट करण्यात आला आहे व तेव्हापासूनच याबाबतची प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती मंडळाच्या परीक्षा फॉर्ममध्ये शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरून घेण्यात येत असल्याचे मंडळाने म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.