Pune News : मी शोबाजी करायला मुंबईला गेलो नाही – दत्तात्रय भरणे

एमपीसी न्यूज – इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काही शोबाजी करायला मुंबईला गेलो नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस गावांना हक्काचे पाणी कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या सव्वातीन वर्षांत  पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात शानिवारी (दि. ४) इंदापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, तालुक्याच्या लाकडी, निंबोडी, म्हसोबाचीवाडी, निरगुडे, शिंदेवाडी, वायसेवाडी, काझड, लामजेवाडी, शेटफळगढे, अकोले, धायगुडेवाडी तसेच बावीस गावे या कायम दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना हक्काचे कायमस्वरूपी पाणी कसे मिळेल यासाठी खडकवासला आणि निरा डावा कालवा यामधून पाणी पुरवठा करता येईल का? तसेच नीर नदी परिसरात नदी कोरडी पडली जाते. या नदीमध्ये सारखे पाणी कसे राहिल नदी कोरडी पडणार नाही, यासाठी नविन धरणासाठी एखादे ठिकाण सापडते का ? याबाबत विचार सुरू आहे, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले.

येणाऱ्या निवडणुकांमध्ये गट-तट विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा गाजेल, याकडे लक्ष द्या, अशी सूचना देखील यावेळी भरणे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.