Pune News : “नक्की कोण चुकलं तेच कळेना”, भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंना भावना अनावर

एमपीसी न्यूज – पुण्यातील मनसेचे पदाधिकारी वसंत मोरे यांचे चुलत बंधू रविंद्र गणपत मोरे यांचे सोमवारी निधन झाले. रविंद्र मोरे यांनी आत्महत्या केली आहे. भावाच्या निधनाचा मोठा धक्का वसंत मोरे यांना बसला आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून रविंद्र मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले, रवी का रे असं केलंस ? तू जायच्या दिवशी रविवारी  सकाळीच 8.30 ला माझ्या समोर तब्बल 17 मिनिटे माझी प्रेस ऐकत बसला होतास. मी तुझ्या नजरेत पाहिले आणि मला तुझ्या डोळ्यातल पाणी दिसलं ही होतं, म्हणूनच मी तुला विचारले देखील काय रे रवी काय झालं? आणि तू नेहमीप्रमाणे हसत बोलास नाय आरे काय नाय आणि निघून गेलास ते गेलास तो ही कायमचाच. मला जेव्हा काल सकाळी तुझ्या पोराने तात्या शेतावर काहीतरी झालंय तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता आणि मी गाडीतील मित्रांना बोलोही होतो. त्याला मला काहीतरी सांगायचे होते राव पण गर्दीमुळे आणि प्रेसमुळे तो कदाचित बोलला नसेल.

 

तो सारा अंदाज तुझी चिट्ठी मिळताच पहिल्या वाक्यातच आला आणि नक्की कोण चुकलं तेच कळेना. ते तुझं वाक्य “तात्या मला माफ कर लय बोलायचं होते रे पण काय करू बोलता येत नाय. बाकी खाली लिहलेले तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे, जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकी सरशी सोडवतो त्याने तुझे प्रश्न नसते का रे सोडावले रवी? आरे रोज आपल्या ऑफिसच्या दारातील गर्दीतून रस्ता काढत जात होतास ना, मग मी तुला त्याही गर्दीत रस्ता दाखवला नसता का रे रवी ?

यातून जनतेने एक मात्र नक्की घ्यावे की आपण बोललं पाहिजे बोललात की सहज कोणत्याही प्रश्नावर  मार्ग निघतात आपली अडचण कोणासोबतही बोला पण बोला आत्महत्या हा प्रश्नावर अडचणीवरचा कधीच मार्ग होऊ शकत नाही. समस्या कधीच संपत नाही पण त्यांची काळजी केली की संपतात ती जिवाभावाची माणसं तेव्हा आयुष्यात कोण तरी असं माणूस असले पाहिजे जिथे सुख दुःख सगळे मनमोकळेपणे मांडता आले पाहिजे, रवी भावा तुला भावपुर्ण श्रद्धांजली.

रविंद्र मोरे यांनी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं आहे. शेवटच्या क्षणी आपल्या भावाला मदत करू न शकल्याचं शल्य वसंत मोरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मांडलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.