Pune News : गॅस वितरकांचा ‘फ्रंटलाइन वर्कर’मध्ये समावेश करा – विशाल तांबे

एमपीसी न्यूज – घरोघरी जाऊन गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या वितरक कर्मचाऱ्यांचा ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून समावेश करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप पूर्णपणे धोका टळलेला नाही. अत्यावश्यक सेवेतील गॅस सिलेंडरचा पुरवठा घरोघरी जाऊन करणारे कर्मचारी अद्याप लसीकरणापासून दूर आहे. गॅस वितरकांना अनेक ठिकाणी लिफ्ट बंद असल्यास सिलेंडरचे ओझे वाहत कित्येक मजले चढावे लागते. अशा वेळी मास्क लावून जिने चढणे कठीण असते. त्यामुळे, अनेकदा त्यांना मास्क काढावे लागते. त्यात एखादा कर्मचारी कोरोनाबाधित असेल आणि तो कोणाच्या संपर्कात आला, तर कोरोना धोका वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे, सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश ‘फ्रंटलाइन वर्कर’मध्ये करावा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.