Dehuroad News : व्यापाऱ्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविणार : रामस्वरूप हरितवाल

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास दुकानांची वेळ वाढविण्याचा निर्णय घेणार

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत लागू केलेल्या नियमांप्रमाणेच देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतही सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सर्व दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी व्यापारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आजच पत्र पाठवून व्यापारी आणि राजकीय नेत्यांच्या भावना आणि मागण्या कळविण्यात येतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास पिंपरी चिंचवडमधील दुकानांबाबतचे नियम कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

राज्य सरकाच्यावतीने महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15  जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या महापालिकांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आहे. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. नव्या नियमानुसार पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिका हद्दीलगत असलेल्या कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत मात्र, फक्त अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना व दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे देहूरोड शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवडप्रमाणेच देहूरोड शहरात सुधारित आदेश लागू करण्याची मागणी व्यापारी आणि राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने आज ( गुरुवारी) देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे केली. तसेच या मागणीचे निवेदनही त्यांना देण्यात आले.

व्यापारी आणि राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे एकूण घेत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आजच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून व्यापारी आणि राजकीय नेत्यांच्या मागण्या कळविण्यात येतील. तसेच कॅंटोन्मेंट हद्दीतील घटलेला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट याचीही माहिती त्यांना देण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास पिंपरी चिंचवडमधील नियम कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मदन सोनिगरा, ॲड. प्रवीण झेंडे, मिकी कोचर, जालिंदर राऊत, अमोल नाईकनवरे, सुर्यकांत सुर्वे, मुकेश फाले आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.