Pune News: भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्समध्ये जबरी चोरी, 12 लाखाचे सोने लंपास

एमपीसी न्यूज: पुण्याच्या हडपसर परिसरातून एक जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका इमारतीच्या सुरक्षारक्षकाने भिंतीला भगदाड पाडून सराफा दुकानातून बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी विरेंद्र बहाद्दूर शहा (रा. मांजरी, मुळ. रानेपाळ) याच्यासह त्याच्या पत्नीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनिल सोनवणे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे हडपसर परिसरात एकक इमारतीत सोन्याचे दुकान आहे. तर आरोपी वीरेंद्र हा त्या इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला या इमारतीची संपूर्ण माहिती होती. बुधवारी मध्यरात्री त्याने सराफ दुकानाच्या पाठीमागून भिंतीला भगदाड पाडले. त्यातून आत प्रवेश केला. तसेच, काचेच्या काऊंटरमधून ६ लाख २ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ५ लाख ३१ हजारांची चांदी आणि रोकड असा एकूण १२ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारदार यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तर, परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.