Pune News : खडसे यांच्या पक्षबांधणी आणि राजकीय अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला नक्की होणार : खा. डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समाजकारण, राजकारण आणि पक्षबांधणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की फायदा होईल, असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिका भवनात बैठकीसाठी ते आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता पक्षात आल्यामुळे खानदेशच नाही तर संपूर्ण राज्याला फायदा होईल. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पवार साहेबांची भेट घेतल्यानंतर कौतुक केले होते. पवार साहेब नेहमी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेत असतात. त्यामुळं त्यांचं कौतुक होणं स्वाभाविक आहे.

या विधेयकावर संसदेत पवार साहेबांनी केलेल्या भाषणात पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रातील कृषी विधेयक हे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं महत्त्व संपविण्याच्या दृष्टीने संपुर्ण नियंत्रण नष्ट करण्यासाठी तयार केले आहे. परंतु याला पर्यायी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. बांधावर सौदे होतात पण तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत हमीभाव पोहोचतो का. हमीभावा संदर्भात या विधेयकात स्पष्टता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे.

केवळ मोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का हे पाहणं गरजेचं आहे. याचा सखोल अभ्यास केला तर भविष्यात कॉर्पोरेट्सच्या हिताचे कायदे न होता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे होतील, अशी अपेक्षा खा. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.