Pune News : स्व. अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात !

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) च्या अंतिम मान्यतेनंतर प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या 15 एकर जागेत महाविद्यालयाचे बांधकाम देखिल सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाची साथ अटोक्यात आल्यानंतर नायडू रुग्णालय बाणेर येथील कोविड सेंटरच्या जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी हा अंतिम प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळतील. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून कमला नेहरु रुग्णालयातून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.