Pune News : नालेसफाई विरोधात महाविकास आघाडीचे महापालिका सभागृहात आंदोलन

एमपीसी न्यूज – नालेसफाई, समान पाणीपुरवठा, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतर्फे महापालिका सभागृहात आंदोलन करण्यात आले. या समस्यांविरोधात आज झालेल्या सर्वसाधारण सभेत जवळपास 25 नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या, नालेसफाईची 50 टक्के टेंडर आल्यावर कामे कशी होणार ?. आंबील ओढ्यालागत मोठा पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासनावर कुणाचाही अंकुश नाही. नालेसफाई केल्यावर राडारोडा उचलला जात नाही. तो तिथेच टाकल्याने वाहून जातो.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, नाला खोलीकरण कामे हाती घेतली आहेत. आंबील ओढ्याचा मागील वर्षी कमी त्रास झाला. कारण त्या ठिकाणी कामे करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीची दुर्घटना पुन्हा होणार नाही. 96 किलोमीटर लाईन्स सफाई केली.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, प्रशासन चांगले काम करीत आहेत. यापुढे काही समस्या जाणवू देऊ नका. नालेसफाई संदर्भात प्रत्येक सभासदाला लेखी अहवाल घ्यावा. शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, प्रशासनाचे काम असताना नगरसेवकांना तोंड द्यावे लागते. नालेसफाईची समाधानकारक कामे झाली नाहीत. दरवर्षी तीच ती चर्चा करून काय उपयोग ? विकासकामे चांगली करा, उधळपट्टी थांबवा.

काँग्रेसचे गटनेते आबा बागुल म्हणाले, नालेसफाईची वाईट अवस्था आहे. 24 बाय 7 योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यासाठी 261 कोटी तरतूद आहे. 30 – 30 वर्षे नगरसेवक असताना नालेसफाईचा प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे आमचीच आम्हाला लाज वाटायला लागली आहे.

भैय्यासाहेब जाधव म्हणाले, वाडगावशेरी मतदारसंघात पावसाळ्यात नालेसफाई कशी होते, हा प्रश्न आहे. आंबील ओढ्याचा प्रश्न आहे तसाच आहे. नाल्यावर बांधकामासाठी परवानगी दिली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

हेमंत रासने म्हणाले, खोदाई मागच्या काळातच सुरू झाली आहे. लॉककडाऊन काळात खोदाई झालेली आहे. विशाल तांबे म्हणाले, शहरातील सर्वच रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. टिळक रोड, अप्पा बळवंत चौक, सहकारनगर परिसरात खोदाई सुरू आहे. 24 बाय 7 योजना नाही तर समान पाणीपुरवठा योजना आहे.

वसंत मोरे म्हणाले, खोदाईच्या कामासाठी लॉकडाऊनचा चांगला फायदा झाला. कात्रज परिसरात यावेळी चांगले काम झाले.

प्रशांत जगताप म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे नालेसफाई विरोधात आंदोलन केले. महापौर तुमचे प्रशासकीय वजन कमी होत आहे का ?. नालेसफाई आपलं प्रथम कर्तव्य आहे. रिटेनेल वॉल उभारल्या पाहिजे. समाधानकारक कामे झाली असतील तर 2 वर्षांत घटना का घडल्या ?. 24 बाय 7 योजनेचे किती टक्के काम झाले?

नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक गणेश ढोरे, प्रमोद भानगिरे, योगेश ससाणे, अश्विनी कदम, प्रवीण चोरबेले, हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, सुशील मेंगडे, महेश वाबळे, मंजुषा नागपुरे, दत्ता धनकवडे, साईनाथ बाबर यांनीही प्रशासनावर टीकास्त्र सोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.