Pune News : कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिकेचा टास्क फोर्स

'इलेक्शन पोलिंग' च्या धर्तीवर लसीकरणाचे नियोजन

एमपीसी न्यूज : कोरोनाचे लसीकरण जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सची पहिली बैठक नुकतीच पार पडली असून प्रभागनिहाय ‘इलेक्शन पोलिंग’ च्या धर्तीवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी, आयएमएचे अधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लस देण्यात येईल.

यानंतर 50 वर्षे वयावरील जोखीमग्रस्त व्यक्तिंना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

लसीचे दोन डोस देण्यात येणार आहे. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी निवडणुकीप्रमाणे प्रभागनिहाय बूथ रचना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी कोव्हीड लसीकरणाकरिता तयार करण्यात आलेल्या कोविन ऍपवर लोड करण्यात येत आहे.

या ऍपवर नोंद झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांनाच लस देण्यात येणार आहे. प्रत्येक बूथवर 1 लस टोचणारा, 2 पर्यवेक्षक आणि 1 सुरक्षाकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाचा दिनांक, वेळ याचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

लसीकरणानंतर संबधिताला निरीक्षणाकरिता अर्धा तास बूथवरच थांबवून घेतले जाईल. अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. लस घेणार्‍या व्यक्तिला ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला आहे, त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तिला प्रमाणपत्र देण्यात येणार आहेअशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

17 जानेवारीपासून पल्स पोलिओ मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 17 जानेवारी 2021 पासून पुढील पाच दिवस शहरात 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. यंदा साधारण ३ लाख 8 हजार मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दीष्ट असून यासाठी पाच हजारांहून अधिक डॉक्टर्स, नर्सेस व स्वंयसेवक सहभागी होणार आहेत.

रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि महामार्गांवर पोलिओ डोस देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.