Pune News: नव कोरोना ! सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – अजित पवार

एमपीसी न्यूज – ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. तर सभागृहात खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.

शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे दक्षता घेत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.