Pune News : पुणे शहरात लॉकडाऊन नाही, महापौर, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 2 लाखांच्या वर गेले आहेत. 1 लाख 66 हजार रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 40 हजारांच्या वर आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन होणार असल्याचे चुकीचे मेसेज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र, पुणे शहरात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसल्याची स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 2 लाखांच्या वर गेले आहेत. 1 लाख 66 हजार रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 40 हजारांच्या वर आहेत. 4 हजार 770 नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के आहे. तर, बरे होण्याचे प्रमाण 78.72 टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील ठिकाणी ‘जनता कर्फ्यू’ स्थानिकांनी लागू केला आहे.

पुणे शहरात सध्याच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या हा पर्याय अत्यंत अडचणीचा आहे. मागील  महिन्यातील लॉकडाउनच्या निर्णयाच्या वृत्त वाहिन्यांवरील ‘व्हिडिओ क्लिप’ सोशल मीडियावर व्हायरल करून पुणे शहरातही लॉकडाउन होणार असल्याच्या जोरदार वावड्या उठल्या. त्यावर खुलासा करताना पुण्यात कुठल्याही प्रकारचे लॉकडाउन होणार नाही. अशा प्रकारचे चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड करू नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

पुणे शहरातील कोरोना रोखण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील  आठवड्यात कंटेन्मेंट झोन पुनर्रचना केली होती. या आदेशांचा चुकीचा अर्थ लावून पुण्यात पुन्हा लॉकडाउन होणार, निम्मे पुणे बंद होणार, अशा अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या होत्या.

पुणे शहराचा अवघा सात चौरस किमीचा भागच कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. लॉकडाऊन लागू करण्या संदर्भात राज्य शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायजरचा वापर करणे, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तर, मागील 5 ते 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आता नव्याने लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. जनता कर्फ्यू लागू करताना व्यापारी आणि नागरिकांना त्रास होऊ नये, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.